पुणे: काही दिवसांपूर्वी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘काकांवर लक्ष ठेवा’ असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार दिला होता. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजीनाम्याची घोषणा करताच त्यास विरोध करणाऱ्यांना दरडवाणाऱ्या अजित पवार यांचे वेगळेच रुप पहायला मिळाले.
त्यावरून राज ठाकरे यांनी आज पुन्हा एकदा अजित पवार यांच्याकडे मोर्चा वळविला. अजित पवार यांचे व्यंगचित्र रेखाटून त्याच्या खाली ‘आता गप्प बसा’ असे लिहू का?’ असा खोचक प्रश्न केला. जागतिक व्यंगचित्र दिनानिमित्त युवा संवाद सामाजिक संस्था व कार्टूनिस्ट्स् कंबाईनतर्फे बालगंधर्व कला दालनात ‘पुणे आंतरराष्ट्रीय व्यंगचित्र महोत्सवा’चे आयोजन केले आहे. त्याचे उद्घाटन आज राज ठाकरे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते.
युवा संवाद सामाजिक संस्थेचे अध्यक्ष धनराज गरड, कार्टूनिस्ट्स् कंबाईनचे अध्यक्ष संजय मिस्त्री, माजी अध्यक्ष चारुहास पंडि यावेळी उपस्थित होते. ७ मे पर्यंत सकाळी १० ते रात्री ८ या वेळात प्रदर्शन सर्वांसाठी खुले आहे असणार आहे.
यावेळी राज ठाकरे म्हणाले, ‘‘व्यंगचित्रे काढायला माझे हात रोजच शिवशिवत असतात. परंतु हवी तशी निवांत बैठक जुळून येत नसल्याने व्यंगचित्र काढत नाही. पण माझी व्यंगचित्रे भाषणातून बाहेर पडतात. मी व्यंगचित्रात-चित्रात रमणारा माणूस आहे. कला तुम्हाला जे दाखवू शकते ते विलक्षण असते.”
उपस्थितांच्या आग्रहाखातर राज ठाकरे यांनी अवघ्या एका मिनीटाच अजित पवार यांचे व्यंगचित्र या व्यंगचित्राखाली ‘आता गप्प बसा’ असे लिहू का’ असा मिश्किल प्रश्नही केला. त्यावेळी उपस्थितांनी टाळ्या वाजवून व हसून त्यास दाद दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश दामले यांनी केले. यावेळी राज ठाकरे यांच्या हस्ते राम सोनकांबळे, बाळासाहेब धोका, पल्लवी जगताप, योगेंद्र भगत, विश्वास सूर्यवंशी, अतुल पुरंदरे, किशोर शितोळे, आकाश गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला.