मुंबई : कार्यकर्त्यांची भावना दुर्लक्षित केली जाणार नाही, असं सांगत शरद पवार यांनी सूचक विधान केलं आहे. शरद पवारांनी राष्ट्रवादीचं अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय मागे घ्यावा या मागणीसाठी कार्यकर्ते यशवंतराव चव्हाण सेंटरबाहेर आंदोलन करत होते. त्यांच्याशी संवाद साधताना पवारांनी आपली भूमिका मांडली.
शरद पवार म्हणाले, “जो काही निर्णय मी घेतला तो पक्षाच्या भवितव्यासाठी घेतला. उद्या पक्षाचं काम कसं चालावं, त्यातून नवीन नेतृत्व इतरांनी करावं हा यामागचा आमचा हेतू होता. ही गोष्ट खरी आहे की, असे निर्णय घेताना सहकार्यांना विश्वासात घेण्याची आवश्यकता असते त्यामुळं तुम्हाला विश्वासात घेऊन निर्णय घेण्याची गरज होती पण मी अशी चर्चा केली असती तर तुम्ही मला कधी होय म्हटला नसता. त्यामुळं तुम्हाला विश्वासात घेऊन निर्णय घेण्याची आवश्यकता होती, पण ती माझ्याकडून घेतली गेली नाही. पण यामागचा हेतू काय होता? आज मी तुम्हाला सांगितला.
आता हा जो निर्णय घेतला, त्यासाठी महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा अनेक तुमचे सहकारी या ठिकाणी आले. माझ्याशी त्यांना बोलायचं आहे. माझी आणि त्यांची भेट संध्याकाळी होईल, ती झाल्यानंतर तुमच्या सर्वांची जी भावना आहे, ती नजरेसमोर ठेऊन आणि बाहेरुन आलेल्या सहकार्यांना विश्वासात घेऊन अंतिम निर्णय एक ते दोन दिवसांत करण्याची भूमिका घेऊ. पण ती घेत असताना कार्यकर्त्यांच्या मनातील भावना दुर्लक्षित केली जाणार नाही, एवढचं आज सांगतो.
दोन दिवसांनंतर तुम्हाला असं बसावं लागणार नाही, हे आश्वासन मी तुम्हाला देतो, अशा सूचक शब्दांत शरद पवार यांनी कार्यकर्त्यांची अश्वस्त केलं. पवारांच्या या विधानानंतर आंदोलनाला बसलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.