पुणे : शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. शरद पवारांच्या राजीनाम्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली. राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्त्यांनी शरद पवारांना हा निर्णय मागे घ्यायला सांगितला, पण पवार या निर्णयावर ठाम राहिले. कार्यकर्ते उपोषणाला बसल्यानंतर तसंच राज्यभरात रस्त्यावर उतरून आंदोलन केल्यानंतर पवारांनी कार्यकर्त्यांना आवाहन केलं. निर्णयाचा पुनर्विचार करण्यासाठी दोन-तीन दिवसांचा वेळ द्या, असं पवारांनी कार्यकर्त्यांना सांगितलं.
5 मे रोजी राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक असून यामध्ये नव्या अध्यक्षपदाबाबत निर्णय होऊ शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे, पण राष्ट्रवादीमध्ये अध्यक्षपदाची निवड कशी होणार? याबाबत पक्षाच्या घटनेमध्ये तरतूद करण्यात आली आहे. देशातल्या प्रत्येक मान्यताप्राप्त पक्षाला निवडणूक आयोगाला त्यांची घटना द्यावी लागते. या घटनेमध्ये अध्यक्ष तसंच इतर पदाधिकारी कसे नेमायचे याबाबतची नियमावली नमूद केलेली असते.
राष्ट्रवादीची घटना
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रत्येकी 3 वर्षांनंतर नव्या अध्यक्षाची निवड होतं असते. 8 महिन्यांपूर्वीच शरद पवार यांची पक्षाच्या अध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली आहे. अध्यक्षांनी कार्यकाल पूर्ण होण्यापूर्वी राजीनामा दिला तर राष्ट्रीय कार्यकारिणी आणि केंद्रीय निवडणूक समिती पुढील निर्णय घेते. राष्ट्रीय कार्यकारिणी आणि केंद्रीय निवडणूक समिती निवडणूक घ्यायची की नाही याबाबत चर्चा करेल, असं नमूद करण्यात आलं आहे.
…तर समिती प्रभारी अध्यक्षदेखील नेमू शकते!
या दोन्ही समितीला राष्ट्रीय अधिवेशन न बोलवता परस्पर चर्चा करून निर्णय घेण्याचा अधिकार आहे. दोन्ही समितीमध्ये अध्यक्ष निवडण्याबाबत चर्चा झाली तर राष्ट्रीय कार्यकारिणीची तात्काळ बैठक बोलवली जाईल. राष्ट्रीय कार्यकारणीतील सदस्य विशिष्ट परिस्थितीत राष्ट्रीय अधिवेशन न बोलवता एकमुखी निर्णय घेऊ शकतात. कमिटीला तसा अधिकार देण्यात आला आहे. समिती शिफारस करेल त्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात येईल. राष्ट्रीय अधिवेशन होईपर्यंत समिती प्रभारी अध्यक्ष देखील नेमू शकते.