मविआची वज्रमूठ सभा महाराष्ट्र दिनी मुंबईमध्ये पार पडली. या सभेमध्ये अजित पवार भाषण करणार का नाही, याबाबत सस्पेन्स निर्माण झाला होता, पण अजित पवारांनी भाषण करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. एकीकडे महाविकासआघाडीची ही वज्रमूठ सभा सुरू असतानाच काँग्रेसच्या बड्या नेत्याने मोठा गौप्यस्फोट केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची भाजपसोबत बोलणी सुरू असल्याचं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले आहेत. कर्नाटकातील निपाणी मतदारसंघात प्रचारादरम्यान त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. या मतदारसंघात काँग्रेस उमदेवाराविरोधात राष्ट्रवादीने उमेदवार दिला आहे, त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे.

अधिक वाचा  ‘हिंदीमध्ये काहीही चूक नाही, महाराष्ट्रातील सर्व मुलांना….’ संजय निरुपम मराठी vs हिंदी वादात काय म्हणाले?

‘राष्ट्रवादी काँग्रेसने इकडे उमेदवार उभा केला आहे. तिकडे ते आमच्यासोबत आहेत, किती दिवस असतील माहिती नाही. कारण भाजपसोबत त्यांची रोज बोलणी चालली आहेत. रोज पेपरमध्ये बातमी येते, कोण नेता जाणार. त्यांनी काय निर्णय घ्यायचा त्यांचा त्यांनी घ्यावा’, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले आहेत.

‘राष्ट्रवादीचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा असतो तो रद्द झाला आहे. त्यांना इतर राज्यांमध्ये मतं मिळाली नाहीत, म्हणून निवडणूक आयोगाने त्यांचा दर्जा काढून टाकला आहे. इतर राज्यांमध्ये जाऊन मतांची टक्केवारी वाढली तर पुन्हा आपल्याला कदाचित राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळेल म्हणून टक्केवारीसाठी निवडणूक आहे. भाजपची टक्केवारीची निवडणूक वेगळी आहे, राष्ट्रवादीची वेगळी आहे’, असा टोलाही पृथ्वीराज चव्हाण यांनी लगावला.

अधिक वाचा  ‘बेहरामपाड्यात जाऊन तिथे…’, उद्धव-राज ठाकरे संभाव्य युतीवर राणेंची जळजळीत प्रतिक्रिया

अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक आमदारांसह सत्तेत सहभागी होणार असल्याच्या बातम्या काही दिवसांपूर्वी समोर आल्या होत्या. या चर्चा वारंवार सुरू झाल्यानंतर अजित पवार यांनी स्वत: समोर येऊन आपण जीवात जीव असेपर्यंत राष्ट्रवादीमध्येच राहणार असल्याचं स्पष्ट केलं होतं, यानंतर त्यांनी वज्रमूठ सभेतूनही सरकारवर टीका केली. आता पृथ्वीराज चव्हाण यांनी हे वक्तव्य केल्यामुळे पुन्हा एकदा या चर्चांना उधाण आलं आहे.