‘मन की बात’ कार्यक्रम माझ्या मनाची अध्यात्मिक यात्रा : पंतप्रधान मोदीपंतप्रधान नरेंद्र मोदी ‘मन की बात’ या रेडिओ कार्यक्रमातून देशवासियांना संबोधित केलं. दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी सकाळी 11 वाजता प्रसारित होणाऱ्या मन की बात कार्यक्रमाचा आजचा शंभरावा भाग आहे. हा कार्यक्रम रेडिओवर तसेच पीएम मोदींच्या अधिकृत ट्विटर हँडल आणि यूट्यूबवर लाईव्ह प्रसारित करण्यात आला. तसेच, भाजपकडून देशभरात ठिकठिकाणी लाईव्ह स्ट्रिमिंग करण्यात आलं होतं. शंभराव्या मन की बातमध्ये बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले की, शंभराव्या पर्वाबाबत हजारो पत्र आणि मेसेज आले आहेत. ही पत्रं वाचून माझं मन भावूक झालं. मन की बातचे शंभर भाग पूर्ण केल्याबाबत अनेकांनी माझं अभिनंदन केलं, पण खरे अभिनंदनाचे पात्र मन की बातचे श्रोते आहेत. पंतप्रधान पुढे बोलताना म्हणाले की, मला तुमच्या सर्वांची हजारो पत्रं आली आहेत, लाखो संदेश आले आहेत आणि मी जास्तीत जास्त पत्रं वाचण्याचा प्रयत्न केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमाच्या पहिल्या भागाची आठवण सांगितली. ते म्हणाले, 3 ऑक्टोबर 2014 हा विजया दशमीचा सण होता आणि आपण सर्वांनी मिळून विजया दशमीच्या दिवशी ‘मन की बात’चा प्रवास सुरू केला. विजया दशमी म्हणजेच, वाईटावर चांगल्याच्या विजयाचा सण, ‘मन की बात’ हा देखील देशवासियांच्या चांगल्या सकारात्मकतेचा अनोखा सण बनला आहे. असाच एक सण, जो दर महिन्याला येतो, ज्याची आपण सगळे वाट पाहत असतो.
‘मन की बात’मुळे जनआंदोलन उभं राहिलं : पंतप्रधान मोदी
मन की बातच्या माध्यमातून जनआंदोलन सुरू झालं. ‘मन की बात’शी संबंधित विषय जनआंदोलन बनला. खेळणी उद्योगाची पुनर्स्थापना करण्याचं मिशन मन की बातनंच सुरू झालं. आपले भारतीय श्वान म्हणजेच, देशी श्वानांबाबत जागरुकता निर्माण करण्याची सुरुवातही मन की बातने झाली. यासोबतच गरीब आणि लहान दुकानदारांशी भांडण न करण्याची मोहिम सुरू करण्यात आली होती. अशाप्रकारे प्रत्येक समाजात परिवर्तनाचं कारण मन की बात बनली.