येत्या जिल्हा परिषद निवडणुकींची ‘ट्रायल रन’ ठरलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीत कुठे प्रस्थापितांना धक्का, तर कुठे नवख्यांना संधी, असे चित्र आहे.मतदारांनी नेत्यांच्या मागे जाण्यापेक्षा जे खरोखरच शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्याच्या योग्यतेचे उमेदवार आहेत, अशांनाच संधी दिल्याचे निकालानंतर दिसत आहे.
सांगली जिल्ह्यातल्या सात बाजार समितीच्या निवडणुका पार पडत आहे. त्यापैकी दोन बाजार समितीच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. तर तीन बाजार समितीसाठी गुरुवारी मतदान झालं होतं, आज याची मतमोजणी पार पडली आहे. सांगली आणि इस्लामपूर बाजार समितुच्या निवडणूका जिल्ह्यामध्ये सगळ्यात लक्षवेधी ठरल्या होत्या. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा पॅनलमध्ये प्रमुख लढत झाली होती. यामध्ये महाविकास आघाडीने भाजपाचा पुरता धुव्वा उडवलेला आहे.
१८ पैकी तब्बल १७ जागांवर महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा दणदणीत विजय झाला आहे. तर एक अपक्ष उमेदवार या ठिकाणी निवडून आला आहे. त्यामुळे भाजपाला महाविकास आघाडीकडून सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूकीत धोबीपछाड देण्यात आला आहे.