मुंबई : घराची खोटी कागदपत्रे बनवत त्याठिकाणी नावाने रेस्टॉरंट सुरू करून देतो आणि व्यवसायात ५० टक्के भागीदारी देतो, असे सांगत व्यावसायिकाला ४५ लाखांचा गंडविण्यात आले.याप्रकरणी वर्सोवा पोलिसात तक्रार दिल्यावर उत्तर प्रदेशचे सपाचे माजी आमदार सुभाष पासी आणि त्यांच्या दोन मुलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार शशिकांत मिश्रा (४२) यांचा ट्रेडिंगचा व्यवसाय असून, त्यांची गेल्या वर्षी पासी यांच्याशी ओळख झाली होती. उत्तर प्रदेशातील सपाचे आमदार असल्याचे त्यांनी मिश्रा यांना सांगितले. वर्सोव्याच्या आरामनगर येथील प्रॉपर्टी भानुदास चव्हाण व शीतल चव्हाण यांच्याकडून २८ जून, २०२१ रोजी पाच वर्षांसाठी भाडेतत्त्वावर घेतली असल्याचे सांगितले. ज्याचा ताबा आता त्यांची मुले निखिल आणि राहुल यांच्याकडे असल्याचेही सांगत त्यांना खोटे कागदपत्र दाखवून त्या ठिकाणी रेस्टॉरंट उघडण्याचे म्हटले. याबाबत मिश्रा यांनी त्यांचा मित्र अरविंद सिंग याला माहिती दिली आणि त्यांनीही त्या ठिकाणी भागीदार बनण्याची तयारी दाखवली. सिंग आणि मिश्राने मिळून वेळोवेळी पासी आणि त्यांच्या मुलांना जवळपास ४५ लाख रुपये पाठवले.वर्ष झाले, तरी रेस्टॉरंट आणि बारबाबतच्या एनओसी न मिळाल्याने मिश्रा यांनी पासीकडे पैसे परत मागितले. त्यांना जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या गेल्या. याप्रकरणी वर्सोवा पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम ३४ आणि ४२० अंतर्गत गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास सुरू आहे.

अधिक वाचा  मंत्रिमंडळ बैठकीत 3 धडाकेबाज निर्णय, नगराध्यक्षांना बहुमताने हटवणार; कॅबिनेटमध्ये 7 मोठे निर्णय