पुणे – कृषी उपन्न बाजार समिती पुणे च्या निवडणुकीत सकाळी ८ तर २ या कालावधीत ९ हजार २९२ मतदारांनी मतदान केले. सकाळच्या टप्प्यात मतदान सुरु झाल्यानंतर पहिल्या चार तासात साधारणपणे ३२ टक्के मतदान झाले. तब्बल २० वर्षानंतर होणाऱ्या बाजार समितीची निवडणूक चुरशीची झाली असून मतदान केंद्रावर मोठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. बोगस मतदान झाल्याचे आरोप-प्रत्यारोप करण्यात आल्याने काही काळ तणाव निर्माण झाला.
बाजार समितीच्या निवडणूकीत १७ हजार ८१२ मतदान आहे. दुपारी २ वाजेपर्यंत ९ हजार २९२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. व्यापारी आडते गटात सर्वाधिक मतदान असून या गटातील निवडणुकीत चुरस आहे. सहकारी सेवा संस्था मतदार संघ आणि ग्रामपंचायत गटातील मतदान सहकारनगर येथील सातव पाटील इंग्लिश मिडियम स्कूल येथे सुरु आहे. व्यापारी अडते गटाचे मतदान शुक्रवार पेठेतील श्री शिवाजी मराठा हायस्कूल येथे सुरु आहे. हमाल-तोलणार गटाचे मतदान मार्केट यार्डातील हमाल पंचायत भवन येथे सुरु आहे. मतदान केंद्र परिसरात मतदारांची गर्दी झाली. श्री शिवाजी मराठा हायस्कूल येथे व्यापारी-अडते गटातील मतदानासाठी मोठी गर्दी झाली होती. बोगस मतदान झाल्याचे आरोप या वेळी करण्यात आले. मतदान केंद्राच्या परिसरात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.