पाटणा: आई-वडील आपल्या मुलांना मोठं करण्यासाठी आणि वाढवण्यासाठी दिवसरात्र कष्ट करतात. मात्र बऱ्याचदा मुलं मोठी झाली की हे सगळं विसरून जातात आणि आई-वडिलांना अतिशय चुकीची वागणूक देतात. आता अशीच काहीशी एक हृदय पिळवटणारी घटना बिहारच्या छपरा येथून समोर आली आहे. या घटनेत दारात बापाचा मृतदेह पडलेला होता आणि यासाठी अंत्यसंस्कारापासून ते श्राद्धविधीपर्यंत पैसे खर्च होणार असल्याच्या भीतीने मुलगा आणि सून घराला कुलूप लावून पळून गेले.
मानवी नातेसंबंधांना लाजवेल अशी ही घटना आहे. बराच वेळ मृतदेह घराच्या दारात तसाच पडून होता, हा प्रकार गावकऱ्यांना समजताच गावकऱ्यांनी पोलिसांना माहिती देऊन मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. ही घटना छपरा जिल्ह्यातील बसाढी गावातील आहे. मुफसिल पोलीस स्टेशन हद्दीतील बसाढी गावातील रहिवासी राज कुमार सिंह हे फार पूर्वीपासून पाटणा येथील दिघा येथे नीरज कुमार सिंह यांच्या घरी काम करायचे. त्यांचं आपल्या गावी फार क्वचितच येणं-जाणं होतं. मुलगा आणि सून जेव्हाही पाटण्याला जायचे तेव्हा ते त्यांना भेटायचे आणि त्यांनी कमावलेले सगळे पैसे सोबत आणायचे. दरम्यान, राजकुमार सिंह यांची प्रकृती ढासळली, मात्र मुलगा आणि सून यांनी उपचारासाठी सहकार्य केले नाही आणि राजकुमार सिंह यांचा वेदनेने मृत्यू झाला. मृत्यूनंतर त्यांचा मृतदेह रुग्णवाहिकेतून त्यांच्या गावी आणल्यावर मृतदेह पाहून मुलगा, सून आणि नातवाने घराला कुलूप लावून पळ काढला.
हे पाहून गावकऱ्यांना खूप आश्चर्य वाटलं. स्थानिक ग्रामस्थ आणि पाटण्यातील लोकांनी मुफसिल पोलीस स्टेशन गाठलं आणि सर्व घटना सांगितल्यानंतर पोलीस ठाण्यात लेखी अर्ज दिला. ग्रामस्थांनी सांगितलं की, राजकुमार सिंह यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी कोणीही नव्हतं. ही घटना संपूर्ण गावात चर्चेचा विषय बनली असून देवाने असा मुलगा आणि सून कोणालाही देऊ नये, असं लोक म्हणत आहेत