काँग्रेसकडून पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण असवा याबाबत सातत्यानं चर्चा सुरु आहेत. अशातच काँग्रेसचे नेते प्रमोद कृष्णम यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. विरोधी पक्षांनी काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांना पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून जाहीर करावं अशी मागणी प्रमोद कृष्णम यांनी केली आहे. राहुल गांधी यांच्याऐवजी प्रियंका गांधी यांच्याकडे पक्षाची कमान सोपवावी, अशी काँग्रेसमधील एका वर्गाची दीर्घकाळापासून इच्छा आहे. अशातच प्रमोद कृष्णम यांनी प्रियंका गांधी यांच्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.
काँग्रेस नेते प्रमोद कृष्णम यांनी प्रियंका गांधी यांना पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर करावा अशी मागणी केली आहे. त्यांच्या या वक्त्व्यानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. यानंतर काँग्रेसमध्ये प्रियांका गांधी यांचे युग सुरू होणार का? असा सवाल देखील उपस्थित केला जातोय. दरम्यान, सध्या कर्नाटक राज्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. 10 मे रोजी यासाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीत काँग्रेसकडून मुख्यमंत्रीपदासाठी अनेकांची नावे घेतली जात आहेत. अशातच आता प्रमोद कृष्णम यांनी पंतप्रधान पदाबाबत वक्तव्य केलं आहे.
प्रियंका गांधी मुख्य भूमिकेत दिसणार?
रायपूरमध्ये भरलेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात सोनिया गांधी यांनी निवृत्तीचे संकेत दिले आहेत. मानहानीच्या प्रकरणात दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व संपुष्टात आले आहे. त्यांना सहा वर्षांसाठी निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवण्यात आले आहे. या निर्णयाला राहुल गांधी यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. मात्र उच्च न्यायालयांकडून त्यांना दिलासा न मिळाल्यास प्रियंका गांधी मुख्य भूमिकेत दिसणार का? असा देखील प्रश्न उपस्थित केला जात आहे. रायबरेलीतून सोनिया गांधींच्या यांच्या जागी प्रियंका गांधी गांधी निवडणूक लढवण्याची चर्चा सुरु आहे. तसेच वायनाड लोकसभा मतदारसंघातून पोटनिवडणूक लढवणार असल्याची देखील चर्चा सुरु आहे. प्रियांका गांधी 2019 मध्ये काँग्रेस सरचिटणीस म्हणून सक्रिय राजकारणात आल्या. परंतू त्यापूर्वी त्यांनी काँग्रेसच्या महत्त्वपूर्ण निर्णयांमध्ये भूमिका बजावली आहे.
गेल्या लोकसभा निवडणुकीनंतर राहुल गांधींनी राजीनामा दिला होता. त्यानंतर प्रियांका गांधींची वेळ आल्याचे बोलले जात होते. मात्र, राहुल गांधींच्या जागी पुन्हा एकदा सोनिया गांधी यांची काँग्रेस अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. सोनिया गांधी यांच्यानंतर झालेल्या संघटनात्मक निवडणुकांमधून मल्लिकार्जुन खर्गै हे काँग्रेसचे अध्यक्ष झाले. काँग्रेसची रणनीती तयार करण्यात आणि संघटनेतील वाद मिटवण्यात प्रियंका पूर्वीप्रमाणेच पडद्याआड सक्रिय आहेत. राहुल गांधी अडचणीत आल्यानंतर प्रियंका गांधी मोठी भूमिका निभावण्याची शक्यता बोलले जात आहे. प्रियंका गांधी यांची भूमिका महत्त्वाची असली तरी राहुल गांधी हे सर्वोच्च नेते असल्या काँग्रेस नेते उदित राज म्हणाले. प्रियंका गांदी सध्या कर्नाटकमध्ये काँग्रेसचा प्रचार करत आहेत. काही महिन्यांपूर्वी त्यांनी हिमाचल प्रदेशात प्रचाराची धुरा सांभाळली होती. स्टार प्रचारक ते समस्या निवारणकर्त्याची भूमिका बजावणाऱ्या प्रियंका गांधी यांचा चेहरा काँग्रेस कसा वापरते, याची प्रतीक्षा करावी लागेल.