मी बोललो नाही तर चर्चा होतात आणि बोललो तर वाद होतात. माझ्या पक्षातील लोक मला कमी स्पष्ट बोलण्याचा सल्ला देतात. मी घरातील वातावरणामुळे घडलो.व्यंगचित्र शोधण्यासाठी केलेला अभ्यासातून भाषणाची कला अवगत झाली. त्यातूनच मी नेमकेपणाने विचार करण्याची सवय झाली असावी. दरम्यान आलेल्या अनुभवातून प्रसंगावधान आले असावे. यासह धर्म, रोजीरोटी आणि सध्याच्या राजकारण आणि घराणेशाहीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपली मते स्पष्टपणे व्यक्त केली.
राज ठाकरे यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीवेळी विचारल्या प्रश्नांना दिलखुलासपणे उत्तरे दिली. त्यांची मुलाखत राष्ट्रवादी काँग्रसचे खासदार अमोल कोल्हे आणि अमृता फडणवीस यांनी घेतली. आता पुलवामा घटनेवरून जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केंद्र सरकारला जबाबदार धरले आहे. यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले, “पुलवामाबाबत २०१९ मध्ये बोललो होते. त्यावेळी डोवाल यांची चौकशी करण्याच मागणी केली होती. त्यावेळी लोक माझ्यावर हसत होते. आता तीच गोष्ट मलिक यांनी सांगितली तर देशात खळबळ उडाली आहे.
केंद्रीय तपास यंत्रणा गैरवापरावर बोलताना राज ठाकरे म्हणाले, “ईडी, सीबीआय (CBI) या यंत्रणा चुकीच्या राबविल्या जातात यात काही दुमत नाही. मात्र या यंत्रणांच्या माध्यमातून अनेक प्रकरणे साफ करणे गरजेचे आहे. ते होत आहे. काँग्रेसच्या काळात रतन टाटांना चौकशीला बोलावले. सत्ता बदलल्यानंतरही तेच होताना दिसत आहे. आता कुठलाही पक्ष ‘पार्टी विथ डिफरन्स’ असा दिसत नाही. राजकारणातील घराणेशाहीवर राज ठाकरे यांनी स्पष्ट मत व्यक्त केले. ठाकरे म्हणाले, राजकारणी घराण्यातील असूनही आज माझ्यावर सर्वात जास्त खटले सुरू आहेत. वेगवेगळ्या आंदोलन केल्याने माझ्यावर सध्या शंभरहून अधिक गुन्हे दाखल आहेत. राजकारणी त्यांची मुले राजकारणात आणू शकतात. मात्र जनतेवर ती लादू शकत नाहीत. राजकारणातील त्यांचे कर्तृत्व त्यांनाच सिद्ध करावे लागेल. एक बाप म्हणून मी अमितला राजकारणात आणू शकतो पण लादू शकत नाही. त्यांना जनतेने स्विकारावे लागेल.
लाव रे तो व्हिडिओवरून ठाकरे म्हणाले, “जाहिरातीच्या विद्यार्थी असल्याने माझा ऑडिओ व्हिज्यूअलवर विश्वास आहे. हे माध्यम जास्त प्रभावी आहे. यापूर्वीही मुंबई शहरातील झोपडपट्यांतील फोटो काढले होते. त्यांचे बाळासाहेबांना प्रेझेंटेशन दिले होते. त्यावेळी तेथील आमदार, नगरसेवक कोण आहेत, याची माहिती दिली होती. त्यात शिवसेनेचे पदाधिकारी होते. मी टीका करण्याची वेळ आली तर करणार. आपण फक्त विरोधासाठी विरोध करणार नाही.