दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या बंगल्याच्या नूतनीकरणावर आणि सजावटीसाठी तब्बल 45 कोटी रुपये खर्च करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. एवढंच नाही तर घरात मार्बल बसवण्यासाठी तब्बल एक कोटी पेक्षा जास्त खर्च करण्यात आला आहे. केजरीवालांच्या बंगल्याच्या सजावटीच्या खर्चावरून आता भाजपकडून जोरदार टीका करण्यात येत आहे. तर भाजपच्या टीकेला ‘आप’काय प्रतिउत्तर देणार? याकडे लक्ष लागले आहे. दिल्लीच्या राजकारणात आता केजरीवालांच्या बंगल्याच्या सजावटीच्या खर्चावरून राजकारण तापण्याची शक्यता आहे.

एका वृत्तानुसार, केजरीवालांच्या बंगल्याच्या नूतनीकरणासाठी तब्बल 45 कोटी रुपये खर्च करण्यात आलेत. या बंगल्यात लाखो रुपयांच्या सजावटीचे वस्तू बसवण्यात आल्यात. एक कोटी 15 लाख रुपयांचे मार्बल व्हिएतनाममधून मागवण्यात आलेत. तसेच 8-8 लाख रुपयांचे येथे पडदे लावण्यात आले असून असे 23 पडदे लावण्यात आल्याने बंगल्याच्या सजावटीचा खर्च कोटींच्या घरात गेला आहे.

अधिक वाचा  मुख्यमंत्र्यांकडून मंत्री अतुल सावे यांना झटका, आमदार तुषार राठोड यांच्या तक्रारीनंतर मंजूर कामांना स्थगिती

दरम्यान, केजरीवालांच्या बंगल्याच्या सजावटीच्या खर्चावरून भाजपने त्यांच्यावर जोरदार प्रहार केला आहे. तसेच काही प्रश्नही भाजपच्यावतीने उपस्थित करण्यात आलेत. स्वतःला सामान्य माणूस म्हणून घेणारे केजरीवाल बंगल्याला रंगविण्यासाठी इतका खर्च कसे करतात? लाखो रुपये किमतीचे पडदे, करोडोंच्या मार्बल खरेदीवर ‘आप’ आता गप्प का? यावर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल का बोलत नाहीत?, असे अनेक प्रश्न भाजपने उपस्थित केलेत. त्यामुळे यावर केजरीवाल काय उत्तर देणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.