वाघोली – डंपरच्या धडकेने दुचाकीवरील दाम्पत्य जागीच ठार झाल्याची घटना वाघोलीत केसनंद फाट्यावर दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली. अपघात एवढा भीषण होता की डंपरने काही मीटर अंतर दुचाकीसह त्यांना फरफटत नेले. डोक्यावरून चाक गेल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली. अशोक मार्तंड काळे व वर्षा अशोक काळे ( रा. कसबा पेठ, पुणे ) असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या दाम्पत्याचे नाव आहे. तर डंपर चालक भास्कर पंढरीनाथ कंद ( वय 51, रा लोणीकंद ) हा अपघातानंतर डंपर सोडून पळून गेला. हा डंपर स्वप्नील भूमकर यांच्या मालकीचा आहे.
पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार काळे दाम्पत्य हे राहू तालुक्यातील वाळकी या गावी शेतीच्या कामासाठी निघाले होते. केसनंद फाट्यावर ते चौकातून राहू रोडकडे वळत होते. पाठीमागून आलेल्या भरघाव डंपरने दुचाकीला धडक देत पुढे फरफटत नेले. दुचाकीसह दाम्पत्य डंपर मध्ये अडकले होते. सिग्नलच्या पुढे वर्षा या रस्त्यावर पडल्या तर अशोक हे पुढे फरफटत गेले. दोघेही चाकाखाली आल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला. अपघात एवढा भीषण होता की त्यांच्या छातीवरील भागाचा चेंदामेंदा झाला. भर चौकात अपघात झाल्याने वाहतूक कोंडी झाली. डंपर चालक अपघातानंतर पळून गेला. बाजूलाच वाघोली पोलीस चौकी असल्याने तेथील अधिकारी, कर्मचारी यांनी त्वरित धाव घेत दोघांचे मृतदेह रुग्णवाहिका बोलावून रुग्णवाहिकेत ठेवले. यानंतर ज्या ठिकाणी त्यांच्या अवयवाचा चेंदामेंदा झाला होता व रक्त सांडले होते. तो भाग पाणी मारून स्वच्छ करण्यात आला. यानंतर वाहतूक व लोणी कंद पोलिसानी वाहतूक सुरळीत केली. काळे हे पोलीस सेवेतून निवृत्त झाले होते. ते सध्या शेतीच्या कामाकडे लक्ष देत होते. तर वर्षा या गृहिणी होत्या. या दाम्पत्याला दोन मुले आहेत.
डंपरचा अति वेगच कारणीभूत
हा अपघात सिग्नल वरच झाला. चौकात सिग्नलच्या आधी वाहनांचा वेग अगदी कमी असतो. मात्र डंपरच्या अति वेगामुळेच हा अपघात झाला. अशी माहिती अपघात बघणार्यांनी दिली. डंपरच्या या वेगाला वाहतूक पोलीस अजिबात वेसण घालत नाही. अनेक चालक हेडफोन घालून डंपर चालवतात. डंपरमुळे होणाऱ्या अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असताना वाहतूक पोलीस मात्र बघ्याची भूमिका घेत आहे. त्यांच्यावर कारवाई करीत नाही. यामागे आर्थिक कारण असल्याचीही चर्चा आहे.