नवी दिल्ली – भारतीय वायुसेनेच्या दोन लष्करी माल वाहतूक विमानांनी 250 हून अधिक भारतीयांना सुदानमधून बाहेर काढले, त्याच्याही आधी नौदलाच्या जहाजाद्वारेही आणखी 278 नागरिकांची सुटका करण्यात आली आहे. अधिकृत आकडेवारीनुसार आतापर्यंत सुदानमधून बाहेर काढण्यात आलेल्या भारतीयांची एकूण संख्या आता सुमारे 530 इतकी झाली आहे.

सुदान मधील भारतीयांना बाहेर काढण्यासाठी भारत सरकारने ऑपरेशन कावेरी हाती घेतली आहे. या इव्हॅक्‍युएशन मिशन अंतर्गत, भारताने जेद्दाह येथे एक ट्रान्झिट सुविधा उभारली आहे आणि सर्व भारतीयांना सुदानमधून बाहेर काढल्यानंतर त्यांना सौदी अरेबियाच्या जेद्दाह शहरात आणि तेथून भारतात नेले जात आहे.

अधिक वाचा  कोथरूड 17 एप्रिलची एकच चाहूल; नातं रक्ताचं अविरत मैत्रीचं अनोख पाऊल! ३२व्या ‘रक्तदान यागा’चं उद्घाटकही मैत्रीचंच; राम बोरकरांचा गौरवास्पद उपक्रम 

278 भारतीयांच्या पहिल्या तुकडीला मंगळवारी भारतीय नौदलाच्या आयएनएस सुमेधाच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. त्यानंतर या कामासाठी हवाईदलाची सी 130 विमाने तैनात करण्यात आली. यातील पहिल्या विमानाद्वारे 121 ते दुसऱ्या विमानाद्वारे 135 जणांना सुदानच्या बाहेर काढण्यात आले. सुदानमधून भारतीयांना बाहेर काढण्यासाठी भारताने सौदी अरेबियातील जेद्दाह शहरात नियंत्रण कक्षही स्थापन केला आहे.

परराष्ट्र राज्यमंत्री व्ही मुरलीधरन या मोहिमवर देखरेख करण्यासाठी जेद्दाहला पोहोचले आहेत. सुदानमध्ये गेल्या 12 दिवसांपासून त्या देशाचे सैन्य आणि बंडखोरांच्या गटात यादवी सुरू आहे. ज्यात आत्तापर्यंत सुमारे 400 लोक मरण पावले आहेत. या युद्धात 72 तासांचा युद्धविराम जाहीर झाल्यानंतर भारताने सुदानमधील नागरीकांना बाहेर काढण्यासाठी आपले प्रयत्न गतिमान केले. गेल्या शुक्रवारी झालेल्या एका उच्चस्तरीय बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुदानमधून भारतीयांना बाहेर काढण्यासाठी आकस्मिक योजना तयार करण्याचे निर्देश दिले होते.

अधिक वाचा  ब्लुमबर्गचे पहिले भारतीय सल्लागार ठरले सुरेश प्रभू