राज्यात सुरु असलेल्या अवकाळी पावसाचा शेती पिकांना मोठा फटका बसत आहे. शेतकऱ्यांची उभी पिकं आडवी झाली आहेत. भंडारा जिल्ह्यातही अवकाळी पाऊस झाला आहे. या पावसाचा मोठा फटका लाल मिरचीला बसला आहे. मसाल्यामध्ये सर्वात महत्वाची असलेल्या लाल मिरचीला अवकाळी पावसामुळं बुरशी लागत आहे. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत. दरम्यान, भंडाऱ्याच्या बाजारात मिरचीची आवक कमी झाल्यामुळं दरात वाढ झाली आहे.

पावसामुळं मिरचीचं नुकसान
कोरोना काळात मिरचीच्या खरेदीमध्ये घट झाली होती. त्यामुळं यंदा भंडारा जिल्ह्यातील मोहाडी, तुमसर, लाखनी या तालुक्यातील मिरची उत्पादक शेतकऱ्यांना मिरचीतून अनेक अपेक्षा होत्या. मात्र अवकाळी पावसामुळं मिरची पिकास चांगलाच मोठा फटका बसला आहे. जेवणाची चव वाढवणाऱ्या लाल मिरचीचे दरही वाढले आहेत. एकीकडं वाढती महागाई आणि दिवसेंदिवस भाज्या आणि जीवनावश्यक वस्तू महाग झाल्यानं गृहिणींचं बजेट कोलमडत आहे. लाल मिरची महाग झाली आहे. दिवाळीनंतर मिरचीची आवक वाढायला सुरुवात होते. मात्र, यंदा पावसामुळे अनेक पिकांचं नुकसानच झालं.

अधिक वाचा  मोदी सरकारला झटका.. वक्फ कायद्याबाबत सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; सरकारला 7 दिवस वेळ तोपर्यंत नव्या कायद्याला स्थगिती

आवक घटली दरात वाढ
दिवाळीनंतर चांगल्या मिरची बाजारपेठेत येत असल्यानं त्या वर्षभरासाठी घेऊन ठेवाव्यात असा मानस असतो. मात्र, यंदा हीच आवक घटल्यानं मिरचीचे दर गगनाला भिडले आहेत. वर्षभरासाठी मिरच्या घेताना जरा विचार करावा लागणार आहे. कारण बाजारपेठेत मागणी तेवढीच आहे. मात्र, आवक घटल्याने आता किंमती वाढल्या आहेत. यावेळी मिरचीचे भाव दुप्पट वाढले आहेत.

हिंगोलीसह यवतमाळ जिल्ह्याला अवकाळीचा मोठा फटका
हिंगोली जिल्ह्यात जोरदार अवकाळी पाऊस झाला आहे. काल झालेल्या झालेला पाऊस आणि गारपीटीमुळं शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. अवकाळी पावसामुळं केळीच्या बागा जमीनदोस्त झाल्या आहेत. अवघ्या 20 मिनिटे झालेल्या गारपिटीनं शेतकऱ्यांचे स्वप्न उध्दवस्त झालं आहे. केळी काढणीला आलेली असताना अवकाळी पावसामुळं शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. यवतमाळ जिल्ह्याला पुन्हा एकदा अवकाळी पावसानं झोडपून काढलंय. यवतमाळच्या बाबुळगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ठेवण्यात आलेला शेतमाल अवकाळी पावसानं मातीमोल झाला आहे. बाजार समितीत शेतकऱ्यांनी विक्रीस आणलेले सोयाबीन आणि चना हे देखील अवकाळी पावसाच्या तडाख्यात सापडले. या पावसामुळं 400 हेक्टरवरील फळबागा, पालेभाज्या, उन्हाळी भुईमूग, सोयाबीन, ज्वारी या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. यापूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे आणि सर्वे हे केवळ एक शासकीय सोपस्कार तर होत नाही नाही ना? असा देखील सवाल आता शेतकऱ्यांकडून विचारला जात आहे.

अधिक वाचा  अनुराग कश्यप का भडकला, म्हणाला… भारतात जातीवाद आहे की नाही? एकदाच काय ते ठरवा’