मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या तीन दिवस साताऱ्याच्या दौऱ्यावर आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पाच दिवसांचा कर्नाटक, नागपूर आणि मॉरिशसचा दौरा आहे. कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकामध्ये मंत्री व्यस्त आहेत.
त्यामुळे मंत्रालयात सुट्टीचे वातावरण आणि राज्यातील जनता वाऱ्यावर असे सध्या चित्र आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तीन दिवस मूळ गावी साताऱ्यात जाऊन बसले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर पुढील सलग पाच दिवस मंत्रालयात नाहीत. विधानसभा निवडणूक प्रचारासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन दिवस कर्नाटकमध्ये आहेत. त्यानंतर एक दिवस नागपूर आणि 28 व 29 एप्रिल असे दोन दिवस देवेंद्र फडणवीस मॉरिशसला जाणार आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोमवारी साताऱ्याला रवाना झाले. राज्यात सध्या उष्णतेची प्रचंड लाट आहे. त्यावरील उपाययोजनांसाठी मुख्यमंत्र्यांनी सोमवारी ‘सह्याद्री’ अतिथीगृहावर सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱयांची बैठक बोलावली होती. हातातील सर्व कामे टाकून जिल्हाधिकारी रणरणत्या उन्हात जिल्ह्यातून मुंबईत आले. या बैठकीला सर्व महत्त्वाच्या विभागांचे अधिकारीही होते. मुख्यमंत्र्यांनी बैठकीची सुरुवात करून दिली आणि काही मिनिटांतच मुख्यमंत्री बैठक अर्धवट टाकून दौऱ्यावर निघाल्यामुळे जिल्हाधिकारी नाराज झाले आहेत. मुख्यमंत्री उद्या (बुधवारी) मुंबईत येतील.
या आठवडय़ात कॅबिनेट नाही
मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री मुंबईत नसल्याने या आठवडय़ात राज्य मंत्रिमंडळाची बैठकही होणार नाही. वास्तविक मंत्रिमंडळ बैठकीत राज्याच्या हिताच्या दृष्टीने अनेक विषय मार्गी लागतात. या बैठकीच्या दृष्टीने मुख्य सचिव पातळीवर अनेक प्रस्ताव तयार झालेले असतात, पण कॅबिनेटच नसल्याने मंजुरी मिळत नाहीत.
मंत्रीही मुंबईतून गायब
राज्याचे मंत्रीही मुंबईतून गायब झाले आहेत. या महिन्याच्या अखेरीस राज्यात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांचा धुरळा उडणार आहे. त्यामुळे बहुतांश मंत्री कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकांसाठी त्यांच्या जिह्यातच मुक्कामाला आहेत.
तीनच दिवस कामाचे
मे महिन्यात तर सुट्टीचे वातावरण असते. 1 मे रोजी सुट्टी आहे. 5 मे रोजी बुद्ध पौर्णिमेनिमित्त सरकारी कार्यालयांना सुट्टी आहे. त्यामुळे मे महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात मंत्रालयात प्रत्यक्ष तीन दिवस कामकाजाचे आहेत याकडे प्रशासकीय अधिकाऱयांनी लक्ष वेधले.