कोकणातील राजापूरमधील बारसू येथील प्रस्तावित रिफायनरीवरून वादंग निर्माण झाला आहे. प्रकल्पाच्या माती परीक्षणासाठी असलेला स्थानिकांचा विरोध पोलीस बळाचा वापर करून मोडून काढत मंगळवारी ड्रिलिंगचे काम सुरू करण्यात आले. यावेळी पोलिसांनी सुमारे ११० आंदोलकांना ताब्यातही घेतले. दरम्यान, याचे तीव्र पडसाद आता राजकीय वर्तुळात उमटताना दिसून येत आहे. महाविकास आघाडी आणि भाजपा शिंदे गटातून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात येत असताना मनसेनेही याबाबत भूमिका स्पष्ट केली आहे. मुंबईत माध्यमांशी बोलताना मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली.

काय म्हणाले नितीन सरदेसाई?

“कोकणातील प्रकल्पांबाबत राज ठाकरे यांनी यापूर्वीही भूमिका स्पष्ट केली आहे. कोकणात रोजगाराच्या संधी खूपच कमी उपलब्ध आहेत. त्यामुळे कोकणातील बरीचशी घरं आज रिकामी दिसतात. कारण येथील तरुण रोजगाराच्या शोधात मुंबईत येतात. त्यामुळे कोकणात पर्यटन आणि येथे पिकणाऱ्या काजू आणि आंब्यासारख्या पिकांवर प्रक्रिया करणारे प्रकल्प कोकणात आले पाहिजेत. यातून येथील स्थानिकांना रोजगार उपलब्ध होईल”, अशी प्रतिक्रिया नितीन सरदेसाई यांनी दिली.

अधिक वाचा  महाराष्ट्रात शहांच्या प्लानवर काम सुरु भाजपनं गियर बदलला; दोन्ही DCMचे होमग्राऊंड ताब्यात घेण्यासाठी टीम देवेंद्रचे शिलेदार सक्रिय

“स्थानिकांशी चर्चा करूनच प्रकल्प आणावे”

“कोकणात अशा प्रकारचे प्रकल्प येत असताना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. मात्र, असं असलं तरीही येथील स्थानिकांना संपूर्णपणे विश्वासात घेऊन आणि त्यांच्यांशी चर्चा करून प्रकल्प आणले पाहिजे, हीच आमची भूमिका आहे. तसेच ६ मे रोजी राज ठाकरे यांची रत्नागिरीत सभा होणार आहे. त्यावेळी याबाबतची सविस्तर भूमिका ते मांडतील”, असेल ते म्हणाले.

रत्नागिरीत राज ठाकरेंची सभा

दरम्यान, यावेळी बोलताना त्यांनी रत्नागिरीत होणाऱ्या राज ठाकरेंच्या सभेबाबतही प्रतिक्रिया दिली. “राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात बोलताना कोकणात दोन सभा घेणार असल्याचे सांगितले होते. त्यापैकी पहिली सभा ६ तारखेला रत्नागिरीत होणार आहे. पक्ष स्थापनेनंतरची रत्नागिरीत होणारी पहिलीच सभा आहे. त्यामुळे या सभेबद्दल सर्वांनाच उत्सूकता आहे”, असे ते म्हणाले.

अधिक वाचा  पाण्यात काठी मारल्याने पाणी तुटत नाही, राज-उद्धव भाऊ भाऊ, कुटुंब म्हणून एकत्र यावं, पण.. : सुषमा अंधारे