गुहागर – “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणासाठी मोठे कष्ट घेतले, आपल्या देशात त्यांच्या इतक्या पदव्या संपादन करणारी एकही व्यक्ती नाही, समाजात सामाजिक समता निर्माण करून त्यांनी क्रांती निर्माण केली. शेतकरी, शेतमजूर, कामगार, महिला, शोषित, पीडित, आदिवासी, भटक्या विमुक्त, ओबीसी या बहुजन समाजातील सर्व लोकांना न्याय द्यायच काम केलं आणि म्हणूनच ज्याने आपल्या प्रकाशाने जगाला प्रकाश दिला ते रत्न म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर होय” असे प्रतिपादन प्रमुख वक्ते या नात्याने बोलत असतांना साहित्यिक शाहिद खेरडकर यांनी केले.
बौद्धजन सहकारी संघ, ता. गुहागर, गिमवी विभाग क्र. ३ व संलग्न सर्व शाखा आणि मुक्काम गाव जानवळे शाखा क्र. २७ यांच्या संयुक्त विद्यमाने विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १३२ वा जयंती महोत्सव विभाग अध्यक्ष मा. राजेश मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात जानवळे गावी संपन्न झाला.
सदर प्रसंगी प्रास्ताविक मनोज गमरे यांनी केले, तर सुत्रसंचालनाची धुरा निलेश गमरे यांनी सांभाळून कार्यक्रमात रंग भरला. स्वागताध्यक्ष प्रवीण जाधव यांनी पाहुण्यांचे स्वागत केले तर माननीय गंगाराम जाधव (गुरुजी), माजी चिटणीस श्रीपत गमरे, बॉक्सिंग मध्ये राज्यस्तरीय कांस्यपदक विजेते आर्मी स्कुलचे राज मोहिते, उद्योजक भूषण पवार, श्रावणी गमरे, साक्षी सकपाळ, स्वाती मोहिते यांचा स्मृतिचिन्ह देऊन विशेष सत्कार तर माध्यमिक, उच्च माध्यमिक, पदवीधर ५० विद्यार्थ्यांना “बुद्ध आणि त्यांचा धम्म” हे पुस्तक देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
सदर प्रसंगी विश्वस्त राजाभाऊ तथा रामदास गमरे, चेअरमन दीपक मोहिते, विश्वनाथ कदम, अध्यक्ष सुनील जाधव, सरचिटणीस महेंद्र मोहिते, माजी चेअरमन रवींद्र मोहिते, डॉ. योगिता खाडे, इंदुलकर गुरुजी, आनंद जाधव आदींनी आपले विचार मांडून मार्गदर्शन केले, सरतेशेवटी कार्यक्रम अध्यक्ष राजेश मोहिते यांनी सर्व कार्यक्रमाचा आढावा घेतला व सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या विभाग कमिटी, संलग्न सर्व शाखा, त्यांचे पदाधिकारी, महिला मंडळ त्याचबरोबर मुक्काम गाव जानवळे या गावातील सर्व जाती धर्माचे ग्रामस्थ, रहिवासी तसेच सुरेश जाधव निर्मित स्वरांजन ऑर्केस्ट्रा यांनी लोकांची करमणूक केली या सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.