देशातील आगामी लोकसभा निवडणुका एका वर्षावर ऐवून ठेपल्या आहेत. या पार्श्वभूमीवरच आगामी निवडणुकीची तयारी सर्वच राजकीय पक्षांनी सुरू केली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात मोठ्या राजकीय घडामोडी पाहायला मिळणार आहेत. यातच आता लोकसभा आणि राज्यसभा खासदारांच्या संख्येत मोठा बदल होणार असल्याची माहिती समोर आली आहे. जनगणनेनुसार मतदारसंघांच्या संख्येत वाढ किंवा घट होत असते. त्यामुळे 2026 नंतर मतदारसंघांच्या संख्येत मोठी वाढ होईल, अशी चिन्हे आहेत. यातच देशाची लोकसंख्या वाढली तरी त्या तुलनेत लोकसभा, राज्यसभा आणि विधानसभेतील प्रतिनिधीत्व कमी असल्याची चर्चा नेहमी होत असते. त्यामुळेच 2026 नंतर लोकसभा आणि राज्यसभेच्या खासदारांच्या संख्येत बदल होण्याची शक्यता आहे. जर असं झालं तर मतदारसंघांची फेररचनाही होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
देशातील लोकसभा आणि राज्यसभेच्या खासदारांच्या संख्येची शेवटची रचना 1971 ला झाली होती. त्यानंतर मतदारसंघांची फेररचना झालेली नाही. मात्र, त्यानंतर देशाच्या लोकसंख्येत मोठी वाढ झाली. त्यामुळे लोकप्रतिनिधींच्या जागांमध्येही वाढ होण्याची शक्यता आहे. यानुसार संपूर्ण देशात लोकसभेचे 800 खासदार असू शकतात. तर राज्यसभेत 332 खासदार असण्याची शक्यता आहे. यानुसार देशातील एकूण खासदारांची संख्या 1132 होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवरच महाराष्ट्रातील लोकसभेच्या खासदारांची सख्या सध्या 48 आहे. तर ही संख्या येणाऱ्या काळात 76 होण्याची शक्यता आहे. तसेच महाराष्ट्रातील राज्यसभेचे सध्या 19 खासदार आहेत. तर ही संख्या येणाऱ्या काळात 31 होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून देशातील नव्या संसद भवनाची चांगलीच चर्चा सुरू आहे. नव्या संसदेचे काही फोटो देखील समोर आले आहेत. त्यामुळे नवे संसद भवन या खासदारांच्या संख्येत होणाऱ्या वाढीच्या पार्श्वभूमीवर तर बांधण्यात आली नाही ना?, तसेच खासदारांच्या संख्येत मोठी वाढ करण्याचा मोदी सरकारचा नवा प्लॅन तर नाही ना?, अशा चर्चाही सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहेत. मात्र, खासदारांच्या संख्येच्या वाढीसंदर्भात अद्याप अधिकृत कुणीही प्रतिक्रिया दिलेली नाही.