मणिपूरमधील भाजपच्या आणखी एका आमदाराने सोमवारी आपल्या प्रशासकीय पदाचा राजीनामा दिला, या महिन्यात राजीनामा देणारे मणिपुरमधील सत्ताधारी पक्षाचे हे चौथे आमदार आहेत.आज उरीपोकचे भाजप आमदार खवैराकपम रघुमणी यांनी मणिपूर रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सीच्या (मनिरेडा) अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.
मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांना दिलेल्या राजीनामा पत्रात, रघुमणी यांनी म्हटले आहे की, वैयक्तिक कारणांसाठी आणि सार्वजनिक हितासाठी मी हे पद सोडत आहे, असे वाटते की मणिरेडाचे अध्यक्ष म्हणून माझे काम चालू ठेवण्याची या क्षणी गरज वाटत नाही असे ते म्हणाले. भाजपला आमदारांच्या राजीनाम्याचा या महिन्यात मोठा फटका बसला असून त्यामुळे मुख्यमंत्री बिरेन सिंग यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
या आधी 8 एप्रिल रोजी, ठोकचोम राधेश्याम यांनी मुख्यमंत्र्यांच्या सल्लागार पदाचा राजीनामा दिला, त्यानंतर 17 एप्रिल रोजी लंथबल येथील आमदार करण श्याम यांनी पर्यटन महामंडळ मणिपूर लिमिटेड या सरकारी संस्थेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.या दोन्ही आमदारांनी आपल्याला या पदावर काम करताना कोणतीही जबाबदारी दिली जात नसल्याचा आरोप केला होता.
वांगजिंग टेंथाच्या आमदार पॉनम ब्रोजेन यांनीही मणिपूर डेव्हलपमेंट सोसायटीच्या अध्यक्षपदाचा 20 एप्रिल रोजी “वैयक्तिक कारणांमुळे” राजीनामा दिला आहे. दरम्यान राज्य सरकारला कोणताही धोका नाही असे भाजप सरकारकडून सांगण्यात आले आहे.