एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यापासून ठाकरे गट एकामागून एक विविध सभा, यात्रा यांच्या माध्यमातून राज्यभर दौरे करताना दिसत आहे. याशिवाय, पोटनिवडणुकीमुळे आत्मविश्वास वाढलेल्या महाविकास आघाडीच्याही वज्रमूठ सभा राज्यभरात होत आहेत.यातच आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेही तयारीला लागली असून, पक्षाध्यक्ष राज ठाकरे कोकण दौऱ्यावर जाणार आहेत. राज ठाकरे यांच्या या दौऱ्याची ठाकरे गटाकडून खिल्ली उडवण्यात आली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे ६ मे रोजी कोकण दौऱ्यावर जाणार आहेत. रत्नागिरीत राज ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे, अशी माहिती नितीन सरदेसाई यांनी दिली आहे. कोकणातील विविध समस्यांवर ही सभा होणार असल्याचे बोलले जात आहे. कोकणात संघटन वाढवण्यावर मनसेकडून भर दिला जात असून, यासंदर्भात हालचाली सुरू झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र, यातच आता ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी राज ठाकरे यांच्या दौऱ्यावर खोचक शब्दांत टीका केली.

अधिक वाचा  मुख्यमंत्री फडणवीसांच्या १०० दिवस आढावा 6 दिग्गज मंत्री फेल; उपमुख्यमंत्री शिंदेंची धक्कादायक कामगिरी

पिकनिकमुळे अनेकदा आले, येतील अन् जातील राज ठाकरे यांच्या कोकण दौऱ्याबाबत विनायक राऊत यांना विचारणा करण्यात आली, तेव्हा ते म्हणाले की, फार काही किंमत आम्ही देत नाही. येतील आणि जातील. पिकनिकमुळे अनेकवेळा आले. आमचे त्याबाबत काही आक्षेप नाही. फार त्याची काही दखल घ्यावी असेही मला वाटत नाही, असा टोला विनायक राऊतांनी लगावला.

दरम्यान, गेल्या वर्षी राज ठाकरे कोकण दौऱ्यावर गेले होते. आता पुन्हा ६ मे रोजी ते रत्नागिरीत जाणार आहेत. काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांच्या या दौऱ्याविषयी जाहीर करण्यात आले होते. सभा नेमकी कोणत्या मैदानात घ्यायची हे ठरत नव्हते. रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या जवाहर मैदानावर ही सभा होणार होती. मात्र, राजकीय सभेसाठी जागा देणार नसल्याची भूमिका संस्थेने घेतल्याने मनसेने आता कै. प्रमोद महाजन क्रीड संकूल हे ठिकाण निश्चित केले आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.

अधिक वाचा  कोल्हापुरात ‘दाभोलकर हत्या आणि मी’, जामीनातील आरोपी विक्रम भावेंच्या पुस्तकात खळबळजनक दावे!