राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल होत आहे. कुठे उन्हाचा तडाका तर कुठे अवकाळी पाऊस पडत आहे. या बदलत्या वातावरणाचा मात्र, शेती पिकांना फटका बसत आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार पुढील पाच दिवस राज्यात तुरळक ठिकाणी गडगडाटीसह अवकाळीचा पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भात मात्र या पाच दिवसात अवकाळी पावसाची तीव्रता अधिक राहून गारपीटीची शक्यता जाणवत असल्याची माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली.
मराठवाड्यासह विदर्भात गारपीट होण्याची शक्यता
आधीच बदलतं वातावरण आणि अवकाळी पावसामुळं राज्यातील शेतकरी संकटात सापडले आहेत. अशातच पुन्हा आणखी राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. पुढील पाच दिवस राज्यात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठवाड्यात गुरुवार आणि शुक्रवार म्हणजे 26 एप्रिल आणि 27 एप्रिलला पावसाची तीव्रता अधिक राहून गारपीट होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. तसेच विदर्भातही गारपीट होण्याची शक्यता आहे.
तापमानात घट होणार, पाच दिवस उष्णतेच्या लाटेची शक्यता नाही
राज्यात पुढील पाच दिवस किमान तापमान चार डिग्रीने तर कमाल तापमान दोन अंश सेल्सिअसने कमी होणार असल्याचा अंदाजही हवामान विभागानं वर्तवला आहे. तर पुढील पाच दिवस राज्यात कोणत्याही उष्णतेच्या लाटेची शक्यता नसल्याचंही हवामान विभागानं सांगितलं आहे.
महाराष्ट्रात शेती पिकांचं मोठं नुकसान
महाराष्ट्रातही काही भागात अवकाळी पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. मराठवाड्यासह विदर्भ पश्चिम महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात या अवकाळी पावसामुळं शेतीचं नुकसान झालं आहे.तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्यानं झाडे उन्मळून पडली आहेत. तर काही ठिकाणी बत्ती गुल झाली आहे. अवकाळी पावसामुळं फळबागांसह रब्बी पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. यामध्ये आंबा, द्राक्ष, केळी, संत्रा या फळबागांसह गहू, हरभरा, मका, मोहरी, ज्वारी या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. तसेच भाजीपाला पिकालाही फटका बसला आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे आंब्याची मोठी नासाडी झाली आहे.