मध्य प्रदेशामध्ये सामूहिक विवाह सोहळ्यामधला एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कौमार्य चाचणी व प्रेग्नंन्सी टेस्टमध्ये नापास झाल्याने काही मुलींचे लग्न लावले नाही. या प्रकारावरुन आता काँग्रेसने शिवराजसिंह चौहान सरकारला घेरलं आहे. मुख्यमंत्री कन्यादान योजनेअंतर्गत मध्य प्रदेशातल्या दिंडोरी जिल्ह्यातील गडसराय इथं शनिवारी २१९ जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा पार पडला. या सोहळ्यासाठी जी यादी बनवण्यात आली होती, त्यात काही मुलींची नावे नव्हती. त्याबद्दल चौकशी केली असता, या मुली गर्भवती असल्याने त्यांची नावे वगळल्याचं सांगण्यात आलं.

काही माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, एका तरुणीने आपला अनुभव सांगितला आहे. या योजनेसाठी तिने फॉर्म भरला होता. त्यानंतर आरोग्य केंद्रात तिची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. तसंच गर्भधारणा चाचणीही झाली. पण चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने तिचं नाव या यादीतून वगळण्यात आलं. इतरही काही मुलींना असाच अनुभव आला आहे.

अधिक वाचा  राष्ट्रीय जलमार्गामुळे कमाईच कमाई; मालवाहतूक 146 दशलक्ष टनांवर, असा झाला फायदा

मंडपात पोहोचूनही या मुलींचं लग्न लागलं नसल्याने असंतोष व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी दिंडोरी भाजपाचे अध्यक्ष अवधराज बिलैय्या म्हणाले, की काही मुली लग्नापूर्वी गरोदर असल्याचं आढळलं आहे. त्यामुळे या चाचण्या योग्य आहेत. याबाबत आयोजन करणाऱ्या अधिकाऱ्यांना विचारलं असता, आम्हाला जसे आदेश आहेत, तसंच आपण केल्याचं त्यांनी सांगितलं.