मुंबई – मुख्यमंत्री पदावरून अनेकदा चर्चा रंगली जाते. नुकतेच भाजप नेते आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस हे आमच्या मनातील मुख्यमंत्री असल्याचे वक्तव्य केले होते.यावरून आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी विखे पाटील यांच्यावर टीका केली आहे. ‘राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या गळ्यात मंगळसूत्र बांधावं,’ असा टोला राऊत यांनी लगावला आहे.
“लग्न एकाबरोबर आणि संसार दुसऱ्या बरोबर हा व्यभिचार आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मनातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील तर त्यांनी फडणवीसांच्या गळ्यात मंगळसूत्र बांधावं. त्यांच्या मनात दुसरे मुख्यमंत्री असतील तर त्यांनी त्यांना बसवावं,” असे संजय राऊत म्हणाले.यावेळी राऊतांनी सरकारच डेथ वॉरंट निघालं असून सरकार गडगडणार आहे पुष्पचक्र अर्पण करा असा थेट इशारा दिला. यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. प्रत्येकजण आपापली गणित मांडत आहेत. परंतु आम्ही निकालाची वाट पाहत आहोत. सध्या मुख्यमंत्री आणि त्यांच्या चाळीस लोकांचे राज्य येत्या पंधरा ते वीस दिवसात गडगडल्याशिवाय राहणार नाही, असं स्पष्ट मत यावेळी संजय राऊत यांनी व्यक्त केलं.
काय म्हणाले होते राधाकृष्ण विखे पाटील ?
एका मुलाखतीदरम्यान, अजित पवारांच्या मनात काय आहे? असा प्रश्न विखे पाटील यांना विचारण्यात आला होता. यावर ते म्हणाले की, “राष्ट्रवादीचे प्रमुख नेते शरद पवार हे संपूर्ण राज्याला संभ्रमात टाकत आहे. पण आता अजित पवार यांनी शरद पवारांना देखील संभ्रमात टाकले आहे. त्यामुळे कोणाच्या मनात काय चाललं हे कळत नाही.”पुढे विखे पाटील यांना तुमच्या मनातील मुख्यमंत्री कोण? हा प्रश्न विचारला. त्यावर “देवेंद्र फडणवीस आमच्या मनातील मुख्यमंत्री आहेत. सध्याच्या आमच्या युतीच्या सरकारमधील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा चांगले नेते आहे. पण आमच्या मनातील मुख्यमंत्री फडणवीस हेच आहेत,” असे विखे पाटील यांनी जाहीरपणे सांगितले.