आज (23 एप्रिल) माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे सभा पार पडणार आहे. यापूर्वी खेड, मालेगाव येथे उद्धव ठाकरेंच्या जाहीर सभा झाल्या आहेत.या सभांमधून उद्धव ठाकरेंनी राज्य सरकारला चांगलेच घेरले होते. महागाई, बेरोजगारीसह शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरुन भाजप-शिंदे सरकारवर निशाणा साधला होता. तर दुसरीकडे शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या समर्थकांनी सभा उधळून लावण्याचा, दगडफेक करण्याचा इशारा दिला आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

दगडफेक करणं महाराष्ट्राचे संस्कार नाहीत: सुप्रिया सुळे माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे यांनी गुलाबराव पाटील आणि त्यांच्या समर्थकांना इशारा दिला आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, एकदा नेता कोणत्याही ठिकाणी सभा घेऊ शकतो आणि जर तो सभा घेतोय तर त्याची सभा उधळून लावणं, दगड फेक करणं योग्य नाही. “दगडफेक करणं महाराष्ट्राचे संस्कार नाहीत” तसचं या प्रकाराबाबत मी गृहमंत्री यांच्याकडे तक्रार करणार आहेच. गृहमंत्री आणि शिंदे- फडणवीस सरकारने याकडे लक्ष द्यावं. महाराष्ट्रात गुंडगिरी चालणार नाही. सत्तेतील नेता जर अशी भाषा करत असेल तर मी याचा निषेध करते या शब्दात सुप्रिया सुळे यांनी हल्लाबोल केला.

अधिक वाचा  राज ठाकरे-उद्धव ठाकरे येऊ शकतात एकत्र, ‘ही’ आहेत पाच कारणं! जाणून घ्या सविस्तर

दरम्यान, जळगावात होणाऱ्या सभेपूर्वीच ठाकरे गट आणि शिवसेना आमने सामने आलेत आहेत. तर आज होणारी उद्धव ठाकरेंची सभा उधळून देण्याचा थेट इशाराच शिंदे गटाच्या शिवसेनेकडून देण्यात आला आहे. त्यामुळे आज जळगावमध्ये ठाकरे गट विरुद्ध शिवसेना असा सामना रंगताना पाहायला मिळण्याची शक्यता आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे. ही उद्धव ठाकरेंनी तिसरी मोठी सभा आहे.