ओला, उबेर रिक्षाने प्रवास करणाऱ्या पुणेकरांसाठी महत्वाची बातमी आहे. पुण्यात अनेक लोक प्रवासासाठी ओला, उबेर रिक्षाचा वापर करतात. पर्यायी स्वस्त आणि चांगली सेवा पुरवली जाते. यामुळे पुणेकर ओला, उबेर रिक्षाला प्राधान्य देतात. आता मात्र पुण्यातील ओला, उबेर रिक्षा बंद होणार आहे. प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या झालेल्या बैठकीत या संबंधीचा निर्णय घेण्यात आला आहे.
‘मोटार वाहन समुच्चयक मार्गदर्शक सूचना- 2020’ नुसार आवश्यक बाबींची पूर्तता होत नसल्याने मे. ॲनी टेक्नॉलॉजी प्रा. लि. पुणे, मे. उबेर इंडिया सिस्टीम्स प्रा.लि., मे. किव्होल्युशन टेक्नॉलॉजीज प्रा.लि. पुणे आणि मे. रोपन ट्रान्सपोर्ट्रेशन सर्व्हिस प्रा.लि. पुणे या चार कंपन्यांना तीनचाकी रिक्षांचे ॲग्रीगेटर लायसन्स पुणे आरटीने नाकारले आहे. पुणे ‘आरटीओ’कडे ओला, उबेर, रॅपीडोसह शहरातील एका कंपनीने अर्ज केला होता. यामध्ये ओला, उबरने तीन चाकी आणि चारचाकीसाठी अर्ज केला आहे, तर इतर कंपन्यांनी तीन चाकीसाठी अर्ज केले होते. पुणे प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत चार कंपन्यांचे ॲग्रीगेटर लायसन्स नाकारताना या अर्जांचा विचार करण्यात आला.
मोटार व्हेईकल ॲग्रीगेटर गाईडलाईन्स, 2020 मधील तरतुदीनुसार चारही अर्ज प्रादेशिक परिवहन प्राधिकरणासमारे सादर करण्यात आले होते. चारही कंपन्यांचे ऑटो रिक्षा संवर्गात ॲग्रीगेटर लायसन्स नाकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर मे. ॲनी टेक्नॉलॉजीज प्रा.लि. व मे. उबेर इंडिया सिस्टीम्स प्रा.लि. यांना चारचाकी हलकी मोटार वाहने संवर्गाकरीता ॲग्रीगेटर लायसन्स जारी करण्याबाबत शासनाकडून मार्गदर्शन घेण्याचा निर्णय प्राधिकरणाने घेतला आहे, अशीही माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांनी दिली आहे.
ओला, उबेर रिक्षा शहरात बंद होणार?
आरटीओने घेतलेल्या या निर्णयामुळे आता पुण्यात ओला उबेरकडून दिली जाणारी प्रवासी सेवा बंद करावी लागण्याची शक्यता आहे. दोन्ही कंपन्यांच्या ॲग्रीगेटर लायसन्सला परवानगी नाकारली आहे. पुण्यात प्रवास करण्यासाठी पुणेकर साधारण स्वत:चं वाहन नसल्यास PMPML, रिक्षा, कॅब किंवा ओला उबर रिक्षाचा वापर करतात. त्यात सर्वात जास्त पुणेकर स्वस्त आणि परवडणारी सेवा ओला, उबेर कडून सेवा पुरवणाऱ्या रिक्षांचा वापर करतात. आरटीओने घेतलेल्या या निर्णयामुळे आता पुण्यात ओला, उबेर रिक्षा बंद होण्याची शक्यता आहे.