नवी दिल्ली – भारतीय विमानतळ प्राधिकरणाद्वारे जयपूरचा आंतरराष्ट्रीय विमानतळ अदानी समूहाला चालवण्यासाठी देण्यात आला आहे. परंतु या व्यवहाराला जीएसटीमधून सूट देण्यात आली आहे.जीएसटी कायद्यातील कलमांचा आधार घेऊन ही सूट देण्यात आल्याचे प्राधिकरणाने म्हटले आहे.
मेसर्स अदानी जयपूर इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडला हा विमानतळ हस्तांतरित करण्याचा व्यवहार नुकताच झाला आहे. या हस्तांतरणावर जीएसटी लागू होतो की नाही यावर निर्णय घेण्यासाठी विमानतळ प्राधिकरणाने ऍथॉरिटी फॉर ऍडव्हान्स रुलिंगच्या राजस्थान खंडपीठाकडे संपर्क साधला होता. व्यवसायाचे हस्तांतरण जीएसटी कायद्यांतर्गत सेवा म्हणून मानले जाते आणि अशा पुरवठा वस्तू आणि सेवा करातून मुक्त आहेत, असा निर्णय याबाबतीत देण्यात आला आहे.
अदानी समूहाने ऑक्टोबर 2021 मध्ये जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे संचालन, व्यवस्थापन आणि विकासासाठी विमानतळ प्राधिकरणाकडून ताब्यात घेतला होता. हा विमानतळ भारत सरकारने अदानी समूहाला 50 वर्षांच्या कालावधीसाठी भाड्याने दिला आहे.तथापि, मेसर्स अदानी जयपूर इंटरनॅशनल एअरपोर्ट लि.वरील पगार/कर्मचारी खर्चाच्या प्रतिपूर्तीसाठी प्राधिकरणाने दिलेले पैसे हे मनुष्यबळ सेवेच्या कक्षेत येतात. म्हणून त्यावर जीएसटी अंतर्गत 18 टक्के कर लागू होतो, असाही निर्णय याबाबतीत देण्यात आला आहे.