कोलकाता : येथील रमजान ईद कार्यक्रमात तृणमूल काँग्रेसच्या सुप्रीमो आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सहभागी झाल्या होत्या. यावेळी त्यांनी सर्वप्रथम सर्वांना सणाच्या शुभेच्छा दिल्या आणि प्रत्येकाला शांततेनं जगण्याचा संदेश दिला.

जनतेला संबोधित करताना मुख्यमंत्र्यांनी भाजपवर निशाणा साधला. ममता बॅनर्जी म्हणाल्या, मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की शांतेत राहा आणि कोणाचंही ऐकू नका. मला देशद्रोही पक्ष आणि एजन्सीशी लढावं लागेल. मी त्यांच्याशी लढत राहीन आणि त्यांच्यापुढं कधीच झुकणार नाही, असंही त्यांनी ठामपणे सांगितलं.

‘जीव देईन, पण देशाची फाळणी होऊ देणार नाही’
ईदनिमित्त आयोजित कार्यक्रमात सीएम ममता यांनी भाजपला चांगलंच घेरलं. त्या म्हणाल्या, ‘आम्हाला बंगालमध्ये शांतता हवी आहे. आम्हाला दंगली नको आहेत. आम्हाला देशात फाळणी नको आहे. ज्यांना देशाची फाळणी करायची आहे, त्यांना मी आज ईदला वचन देते, मी जीव द्यायला तयार आहे. पण, मी देशाचं विभाजन कधीच होऊ देणार नाही.’

अधिक वाचा  ‘फुले’ हिंदी चित्रपट ट्रेलर पाहून अंदाज लावू नका, चित्रपट पाहा”, ‘फुले’ चित्रपटाच्या वादावर दिग्दर्शक अनंत महादेवन यांची प्रतिक्रिया

बंगालमध्ये अशांतता निर्माण करण्याचा भाजप सरकारचा प्रयत्न आहे. बंगालमध्ये अशांतता मी कोणत्याही प्रकारे खपवून घेणार नाही. आज संविधान बदललं जात आहे, इतिहास बदलला जात आहे. त्यांनी एनआरसी आणली, पण मी त्याची अंमलबजावणी होऊ देणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.