काही दिवसांपूर्वीच निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेतला. या निर्णयामुळे राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. यातच आता पक्षाचे अस्थित्व सिद्ध करण्यासाठी पक्षाने आगामी कर्नाटक निवडणुकीत उमेदवार उतरवण्याची घोषणा केली होती. त्यानुसार आता पक्षाने आपली पहिली यादी जाहीर केली आहे.
कर्नाटक राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी एकाच मतदान दिवशी होणार आहे. 10 मे रोजी मतदान आहे तर 13 मे रोजी निकाल जाहीर होणार आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात भाजप आणि काँग्रेस हे दोन प्रमुख पक्ष आहेत. यात राष्ट्रवादीनेही उडी घेतली आहे. काही दिवसांपूर्वीच झालेल्या पक्षाच्या बैठकीत निवडणूक लढवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता यादीही जाहीर करण्यात आली आहे.एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, पक्षाने 9 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यानुसार, कोडगू (1 जागा), म्हैसूर (1 जागा), बेळगाव निपाणी (1 जागा), विजापूर (1 जागा), कोप्पळ (1), हवेरी (1), विजयनगर (1) या ठिकाणी पक्षाने आपले उमेदवार उतरवले आहेत.
याशिवाय, पक्षाने आपल्या स्टार प्रचारकांची यादीही जाहीर केली आहे. स्टार प्रचारकांमध्ये अध्यक्ष शरद पवार यांच्यासह प्रफुल पटेल, सुप्रिया सुळे, मो. फैजल आणि इतर 15 जणांची नावे आहेत.निवडणूक आयोगाचा राष्ट्रवादीला धक्का काही दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय दर्जा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का मानला जात आहे. राष्ट्रवादीसोबतच तृणमूल काँग्रेस आणि सीपीआयचा देखील राष्ट्रीय दर्जा काढून घेण्यात आला आहे. दरम्यान, आपला राष्ट्रीय दर्जा देण्यात आला आहे.