मुंबई : सध्या आयपीएलच्या सोळाव्या हंगामाचा थरार रंगला आहे. आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधारांमध्ये भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचे नाव घेतले जाते.त्याच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्जच्या संघाने चारवेळा आयपीएलचा किताब पटकावला आहे. आयपीएल २०२३ मध्ये ५ सामन्यांतील ३ सामने जिंकून धोनीचा संघ आताच्या घडीला गुणतालिकेत सहा गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. चेन्नईचा पुढचा सामना २१ तारखेला सनरायझर्स हैदराबादविरूद्ध होणार आहे. मात्र, संघाचा कर्णधार धोनी यंदा आयपीएलमधून निवृत्तीची घोषणा करणार का याकडे सर्व क्रिकेट विश्वाचे लक्ष लागून आहे.
दरम्यान, आयपीएल सुरू होण्याच्या आधीपासूनच धोनीच्या निवृत्तीची चर्चा रंगली होती. पण अनेक खेळाडूंनी धोनी आणखी २-३ वर्षे खेळेल असा विश्वास व्यक्त केला आहे. चेन्नईचा माजी खेळाडू केदार जाधवने मात्र धोनीचा हा अखेरचा आयपीएल हंगाम असल्याचे बोलले आहे. अशातच भारताचा माजी खेळाडू मुरली विजयने चाहत्यांना एक सल्ला दिला आहे.
प्रत्येकजण फक्त निवृत्तीबद्दल बोलतोय- महेंद्रसिंग धोनीने मागील हंगामात चेन्नईच्या संघाचे कर्णधारपद सोडले होते. पण रवींद्र जडेजाच्या नेतृत्वात सीएसकेला विजयाची लय कायम ठेवता आली नाही. त्यानंतर जडेजा कर्णधारपदावरून पायउतार झाल्यानंतर पुन्हा एकदा धोनीने नेतृत्व करण्यास सुरूवात केली. दरम्यान, धोनीच्या निवृत्तीच्या प्रश्नांबद्दल बोलताना मुरली विजयने स्पोर्ट्सकीडाशी बोलताना म्हटले, “हा खेळाडूंचा वैयक्तिक निर्णय आहे, क्रिकेटपटू कोणत्या परिस्थितीतून जातात हे लोकांना समजले पाहिजे. तो जवळपास 15 वर्षे भारताकडून खेळला आहे. आपण त्याला वेळ द्यायला हवा आणि तो कधी निवृत्त होत आहे याचा दबाव त्याच्यावर टाकू नये. एमएसच्या निवृत्तीवर सर्वजण प्रश्न उपस्थित करत आहेत हे अत्यंत चुकीचे आहे.”